कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी आदर्श आचारसंहिता दि.१५/१२/२०२५ रोजी लागू झाली आहे. या आचारसंहितेच्या कालावधीत राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी विविध इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांद्वारा प्रसिध्द करावयाच्या जाहिरातींसाठी, सदर जाहिरातींचे पूर्वप्रमाणन करणे आवश्यक आहे. मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी दि.९ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘निवडणूकीच्या प्रयोजनार्थ प्रसार माध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश २०२५’ ही अधिसूचना काढली असून, या अधिसूचनेच्या अनुषंगाने महापालिकेमार्फत इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवरील जाहिरातींच्या पूर्वप्रमाणनाची कार्यवाही करण्यात येणार आहे.
या अधिसूचनेच्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती गठीत केली असून, पोलीस आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.कल्याणजी घेटे, महापालिकेचे आचारसंहिता पथक प्रमुख व अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, समन्वय अधिकारी संजय जाधव हे सदस्य या समितीत असून, सदस्य सचिव माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे आहेत.
या निवडणूकीमध्ये कोणत्याही पक्षास अथवा उमेदवारास विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांद्वारे उदा.डिजीटल व्हॅन, दूरदर्शन, उपग्रह वाहन्या, व्हिज्युअल डिस्प्ले, वगैरे ठिकाणी जाहिरात प्रसारित करावयाची झाल्यास या जाहिरातीचे पूर्वप्रमाणन, माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीमार्फत करणे आवश्यक आहे.
प्रस्तावित जाहिरात प्रसारित/प्रसिध्द करण्याच्या दिनांकापूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या किमान पाच दिवस आधी सदर समितीकडे जाहिरातीचे पूर्वप्रमाणन करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. सदर अर्ज महापालिका भवनातील तळ मजल्यावरील केंद्रीय एक खिडकी कक्षामध्ये उपलब्ध होईल. सदर अर्जासोबत प्रसारित करावयाच्या जाहिरातीची इलेक्ट्रॉनिक्स स्वरुपाची प्रत (दोन पेनड्राईव्हमध्ये), राजकीय पक्षाच्या पदाधिकार्याने किंवा उमेदवाराने साक्षांकीत केलेल्या जाहिरात संहितेच्या दोन मुद्रीत प्रती जोडावयाच्या आहेत. सदर जाहिरात प्रसारण/प्रसिध्दीसाठी येणारा खर्च राजकीय पक्षाने केले असल्यास पक्षाच्या अथवा उमेदवाराने केला असल्यास उमेदवाराच्या निवडणूक खर्चात अंतर्भुत करणे आवश्यक राहिल.
खालील स्वरुपाच्या आशयाचा समावेश असलेल्या जाहिराती प्रसारित/प्रसिध्द करता येणार नाहीत व अशा स्वरुपाच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणनही केले जाणार नाही, (१) भारतीय संविधानाची पायमल्ली, केंद्र/राज्य शासनाच्या कायद्यांचे उल्लंघन, (२) राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांची पायमल्ली, (३) धर्म, वंश, जात, लिंग, भाषा, पेहराव इत्यादींच्या आधारे तेढ अथवा शत्रुत्वाची शक्यता, (४) प्रार्थना स्थळांचे छायाचित्र/छायाचित्रणाचा समावेश, (५) कायदा व सुव्यवस्थेला आव्हान, हिंसेला प्रोत्साहन, शांततेचा भंग, (६)न्यायालयाचा अथवा एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेची बदनामी, (७) देशाच्या ऐक्याला, सार्वभौमत्वाला आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा, (८) अन्य कुठल्याही देशावर टिका, अवमानजनक टिप्पणी अथवा तिरस्कारपूर्ण विधान, (९) संरक्षण दलाच्या अधिकारी/कर्मचारी अथवा संरक्षण दलाचे छायाचित्र/छायाचित्रण, (१०)राजकीय पक्ष, राजकीय नेता किंवा अन्य कोणावरही खोटे आरोप, (११) कुठल्याही राजकीय रेत्याच्या अथवा व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप, (१२) नीतिमत्ता व सभ्यतेचे उल्लंघन, (१३) अश्लिलतेला प्रोत्साहन.
मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेव्यतिरिक्त अन्य भाषेतील प्रस्तावित जाहिरातीचे पूर्वप्रमाणन करण्यासाठी अर्ज सादर करताना संबंधित भाषेतील जाहिरातीच्या इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील २ प्रती सोबत देणे आवश्यक असून, त्यासोबत सदर जाहिरात संहितेचा मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत अनुवाद करुन राजकीय पक्षाच्या पदाधिकार्याने किंवा उमेदवाराने साक्षांकीत केलेल्या जाहिरात संहितेच्या दोन मुद्रीत प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच त्यासोबत सदर प्रस्तावित जाहिरातीचा मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत यथार्थ अनुवाद करण्यात आला असून, कोणत्याही चुकांकरीता अर्जदार जबाबदार असेल. असे निश्चियपूर्ण कथन करण्यात येत आहे, असे नोटराईझ प्रतिज्ञापत्र अधिसूचनेतील परिशिष्ट-५ प्रमाणे सादर करणे आवश्यक असेल.
प्रस्तावित जाहिरातीचा पूर्वप्रमाणनाचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर तो कार्यालयीन कामकाजाच्या तीन दिवसात समिती निकालात काढेल आणि अर्ज निकाली काढताना समिती जाहिरातीचा कोणताही भाग बदलेल अथवा फेरबदल करेल किंवा दुरुस्ती करेल त्यानुसार कार्यवाही करणे संबंध?ित राजकीय पक्ष/उमेदवारावर/अर्जदारावर बंधनकारक असेल.
तरी महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ नि:पक्षपाती पार पाडण्यासाठी आणि आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने अधिसुचनेच्या माध्यमातून निश्चित केलेल्या कार्यपध्दतीचे राजकीय पक्ष व उमेदवार यांनी पालन करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.
