व्हॉट्सअॅप डीपी आणि स्टेटसवर फोटो ठेवण्याच्या किरकोळ कारणावरून कल्याणमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर मुख्य आरोपीने स्वतःवरही गोळी झाडून घेतल्याची माहिती समजते. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. कल्याण पश्चिमेतील मोहने परिसरात राहणार्या अभिषेक पवार उर्फ अभी आणि गौरव साळुंखे यांच्या गटामध्ये जुना वाद होता. २६ मे रोजी तरुणांच्या दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता अशी माहिती समोर आली आहे. पाटीलनगर परिसरात राहणार्या मोनू फुलोरे या तरुणाने गौरव साळुंखेसोबतचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला होता. हा फोटो पाहून अभिषेक पवार प्रचंड चिडला. शुक्रवारी रात्री तो आपल्या दहा ते बारा साथीदारांसह मोनू फुलोरेचा शोध घेत पाटीलनगरमध्ये पोहोचला. अभिषेक आणि त्याच्या साथीदारांना पाहताच मोनू फुलोरे आणि त्याचा भाऊ तेथून पळून गेले. यावेळी अभिषेकने मोनूच्या दिशेने पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. सुदैवाने या गोळीबारातून मोनू फुलोरे बचावला. यानंतर अभिषेक पवार याने स्वतःच्या हातावर गोळी झाडून घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सुरुवातीला मोनू फुलोरेने गोळीबार केल्याची चर्चा होती. मात्र, खडकपाडा पोलिसांच्या तपासात संपूर्ण घटनाक्रम उघड झाला. या प्रकरणी पोलिसांनी सोहेल तांबोळी आणि विजय भूतकर या दोघांना अटक केली आहे. जखमी अभिषेक पवार याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमागील नेमके कारण आणि इतर आरोपींचा सहभाग याबाबत खडकपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
