बदलापूर : बदलापूरमध्ये सह्याद्री सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमधील तीन डॉक्टरांविरोधात गंभीर गुन्हे दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. योगेश मिंडे, डॉ. अनंत ठाणगे आणि डॉ. मनीष वाधवाणी अशा तिघांची नावे या प्रकरणात आहेत. ही कारवाई प्रवीण समजीस्कर या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित आहे.

प्रवीण समजीस्कर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. कुटुंबासोबत काही समाजसेवकांनीही गेल्या वर्षभरापासून आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. प्रवीण समजीस्कर दुचाकीवरून पडल्याने त्याच्या चेहर्‍याला किरकोळ दुखापत झाली होती. ही जखम साधी असतानाही हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र शस्त्रक्रिया करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत तक्रारी केल्या होत्या.

आरोग्य विभागाच्या चौकशीनंतर डॉक्टरांचा हलगर्जीपणा ठळकपणे समोर आला. त्यानंतर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तिन्ही डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. एकाच वेळी तीन डॉक्टरांवर केस नोंदवल्याने बदलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *