कल्याण : मित्र पक्षाने सर्वाधिक जागा लढवून भाजप एक नंबरवर आला, त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले.मात्र शिवसेनेने कमी जागा लढवूनही सर्वाधिक स्ट्राइक रेंज दाखवली असून आम्ही कुठेही कमी नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला. `नकलीव्दार कीए ढेर, कोण हे असली शेर’ असे म्हणत शिवसेनेची ताकद पुन्हा तळपती तलवारीसारखी असल्याचे स्पष्ट केले.

कल्याण प. वैष्णवी लॉन्स, भगवा तलाव येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. कल्याण-डोंबिवली महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवणार असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले की लोकसभेत कल्याण राखले. विधानसभेत महायुतीचा झेंडा फडकवला, तसेच आतापर्यंत ६५ ते ७० ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले. या यशाचे श्रेय तळागाळातील कार्यकर्ते आणि `लाडक्या बहिणीना’ देत त्यांनी सर्वाचे अभिनंदन केले. लाडकी बहीण योजनेवर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कितीही विरोध झाला तरी ही योजना बंद होणार नाही. ‘ आम्ही जे बोलतो ते करतो ‘ अशी ग्वाही देत त्यांनी २१०० रु. मुद्द्यावरही शब्द पाळला जाईल, असे स्पष्ट केले. सांगली जिल्ह्यातील विटा नगरपरिषद निवडणुकीत आठवण सांगत, कठीन परिस्थितीतही लाडक्या बहिणींनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच भगवा फडकावला ,ते असे म्हणाले. महाविकास आघाडीवर टीका करताना त्यांनी सांगितले की, प्रचारात विकासाचा मुद्दा सोडून दिल्याने त्यांना जनतेने नाकारले. `लोकसभा ,विधानसभा जिंकलो ; आता महापालिकेतही महायुतीचा बोलबाला राहील,’ असा दावा त्यांनी केला. कल्याण डोंबिवलीतील विकासकामांचा उल्लेख करताना रेल्वे, रस्ते ,कस्टर योजना ,झोपडपट्टी व धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासाबाबत ठोस भूमिका मांडली, कस्टर योजनेमुळे नागरिकांच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा शब्द त्यांनी दिला.
मेळाव्यास कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, माजी महापौर रमेश जाधव, वैजयंती घोलप, अरविंद मोरे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शहरातील काही कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक नेतृत्वाबद्दल नाराजीची चर्चा असून, आगामी महापालिकेच्या निवडणुकीत संघटनात्मक समन्वय अधिक मजबूत करण्याची गरज असल्याची भावना जुन्या जाणत्या शिवसेना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
