डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील भाजप अंतीम उमेदवार निवड यादीतील उमेदवारांना भाजपने आपल्या पक्ष कार्यालयातून ए, बी अर्जाचे वाटप केले. ए, बी अर्ज प्राप्त होताच, काही उमेदवारांनी तातडीने निवडणूक कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. डोंबिवली पश्चिमेत उमेदवारी निश्चित असलेल्या भाजपचे नेते दीपेश पुंडलिक म्हात्रे आणि त्यांचे बंधू जयेश म्हात्रे यांनी ह प्रभाग कार्यालयात येऊन सोमवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मोठागाव प्रभागातून आपल्या घराजवळून हजारो महिला, पुरूष कार्यकर्ते सोबत घेत दीपेश म्हात्रे यांनी निवडणूक कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन केले. दीपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे यांच्या विजयाच्या घोषणा यावेळी दिल्या जात होत्या. याशिवाय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा जयघोष यावेळी केला जात होता. दीपेश म्हात्रे यांच्या मातोश्री रत्नाबाई म्हात्रे आणि म्हात्रे कुटुंबीय या शक्ती प्रदर्शन फेरीत सहभागी झाले होते.

ठाकरे गटातून काही महिन्यापूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले दीपेश म्हात्रे हे कल्याण डोंबिवली पालिकेतील भाजपचे महापौर पदाचे उमेदवार म्हणून ओळखले जातात. तसेच, नंतरच्या डोंबिवली विधानसभेचे विभाजन झाले तर पश्चिम भागाचे विधानसभेचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. या सर्व लक्ष्यांवर नजर ठेऊन दीपेश म्हात्रे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी जुळते घेऊन भाजपमध्ये नव्या दमाने काम सुरू केले आहे.‘भाजप नेत्यांनी दिलेल्या निर्दशाप्रमाणे आपण सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. आपल्या सोबत आपला भाऊ जयेश म्हात्रे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. पॅनल क्रमांंक २३ मधून आम्ही दोघांनी उमेदवारी अर्ज भरले. पक्षाने आदेश दिले तर उरलेल्या दोन जागाही लढविण्याची सज्जता आम्ही केली आहे. पण पक्ष नेते सांगितल त्यानंतरच आम्ही पुढील भूमिका घेऊ. पॅनल क्रमांक २३ मधून आमचे चारही उमेदवार निवडून येतील यासाठी आम्ही आमच्या ताकदीने प्रयत्न करू,’ असे दीपेश म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

कल्याण पूर्व भागात भाजपने निश्चित केलेल्या आपल्या नऊ उमेदवाराना पक्ष कार्यालयातून ए, बी अर्ज वाटप करण्यात आले. कल्याण पूर्व भागातून भाजपमधून उमेदवारी मिळावी म्हणून अनेक इच्छुक तयार होते. पण या इच्छुकांंमधून प्रस्थापित, निवडून येण्याची क्षमता असलेले, त्यांच्या कार्यमूल्यमापनाचा अहवाल बघून त्यांना उमेदवार्‍या दिल्या. यामध्ये कोठेही घराणेशाही येणार नाही. एकाच कुटुंबातील दोन ते तीन जणांना उमेदवार्‍या मिळणार नाहीत याची दक्षता भाजप नेत्यांनी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *