कल्याण : गोवेली येथे २५ हजार दिव्यांचा दिव्य दीपोत्सव सोहळा पार पडला. धर्म जागरण महोत्सवात सोमवारी (ता. २३) सायंकाळी हा सोहळा साजरा करण्यात आला. बालयोगी सदानंद व स्वामी गोविंददेव गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे २५ हजार दिव्यांच्या प्रकाशात परिसर उजळून निघाला होता.

अखिल ठाणे जिल्हा वारकरी संप्रदायातर्फे मंगळवार (ता. १६) पासून धर्म जागरण महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या महोत्सवाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील स्वागताध्यक्ष आहेत. या महोत्सवाला राज्यभरातून हजारो वारकरी व भाविकांनी उपस्थिती लावली आहे. या महोत्सवात रविवारी (ता. २२) संत पूजनाचा सोहळा पार पडला. या वेळी बालयोगी सदानंद, अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांची उपस्थिती होती. या वेळी माजी आमदार गोटीराम पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. रामायणाचार्य विश्वनाथ वारिंगे व माधव केशव यांनी महोत्सवाचे नियोजन केले आहे. या महोत्सवात सायंकाळी दीपोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी हजारो भाविकांनी हातात पणती घेऊन दीपोत्सवात सहभाग नोंदवला. या वेळी सुमारे २५ हजारांहून दिवे प्रज्वलित करून पसायदाना-बरोबरच प्रार्थना करण्यात आली. यामुळे परिसर दिव्यांच्या प्रकाशाने न्हाऊन निघाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *